FAIL (the browser should render some flash content, not this).

शिखर शिंगणापूर इतिहास


शिखर शिंगणापूर येथून दहा मिनिटांच्या अंतरावर गुप्तलिंग हे देवस्थान आहे. शिखर शिंगणापूरची कथा हि गुप्तलीगापासूनच सुरु होते.

अख्यायिका अशी आहे कि गुप्तलीगावर श्री शंभू महादेव घोर तपश्चर्येला बसले होते. पार्वती माता भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा आपटता क्षणी त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वती मातेने श्री शंभू महादेवांची क्षमा मागितली. पार्वती मातेच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वती मातेचे मिलन झाले. भगवान शंकर आणि पार्वती माता यांचा विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पार पडला.

गुप्तलिंग हे सातारच्या छत्रपतींच्या शाही घराण्याचे खाजगी देवस्थान आहे. या ठिकाणी श्रमदानातून आणि छत्रपतींच्या फंडातून जीर्णोद्धार केला गेला आहे. गुप्तलिंगावर आजही दोन कुंडे प्रवाहित आहेत. एक जटा कुंड ज्या ठिकाणी श्री शंभू महादेवानी आपल्या जटा आपटल्या होत्या आणि दुसरे आहे भागीरथी कुंड जे पार्वती मातेचे कुंड म्हणून ओळखले जाते.

गुप्तलिंगाच्या मंदिरापर्यंत जाण्याकरिता प्रशस्थ पायऱ्यांची वाट आहे. आपली गाडी पार्क करून पाच ते दहा मिनिटे चालत गेल्यावर थंडगार गुप्तलिंगाच्या मंदिराचे दर्शन होते. रणरणत्या उन्हातही गुप्तलिंग यात्रेकरूना थंडावल्याचा अनुभव देऊन जाते. गुप्तलींगाचे दर्शन घेतल्याशिवाय श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरचे दर्शन पूर्ण होत नाही.

गुप्तलिंगी श्री शंभू तपश्चर्येला आले
थंडगार डोंगरावर ध्यानस्थ बसले
पार्वती प्रकटली भिल्लीणीच्या रुपात
तपश्चर्या मोडली गुंगली तांडव नृत्यात

भंगताच तपश्चर्या श्रीची मुद्रा संतापली
रागाच्या भरात जटा शिळेवर आपटली
शिळेतून त्याक्षणी जटाकुंड प्रकटले
तपश्चर्या मोडली श्री शंभू रागावले

पार्वतीने करून याचना श्रींना शांत केले
गुप्तलिंगी शंभू पार्वतीचे मिलन झाले
गुप्तलिंगी पार्वतीचे भागीरथी कुंड प्रकटले
जटा कुंड, भागीरथी कुंड गुप्तलिंगी खाळाळले

डोंगरावर विवाह केला शिव पार्वतीने
स्थानबद्ध झाले दोघे पिंडीच्या रूपाने
तेथेच आज श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर आहे
गुप्तलिंगी आजही भागीरथी, जटा कुंड वाहे

दर्शनाने ज्याच्या सर्वांची दुखे होती दूर
तेच मोठा महादेवाचे श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर
तेच मोठा महादेवाचे श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर........