FAIL (the browser should render some flash content, not this).

शिखर शिंगणापूर परिसर



शिखर शिंगणापूरचे दर्शन घेताना त्याच्या सभोवतालच्या निसर्गाची व तेथील अनमोल इतिहासाची जाणीव होते. तेथील प्रत्येक बारकावा आपल्याला कळावा यासाठी या पानावर काही चित्रांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक अनमोल ठेव्याची माहिती जशी आम्हाला प्राप्त झाली त्या स्वरुपात तुमच्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.



पूर्वीच्या पायऱ्यांच्या रस्त्यावरून मंदिराकडे येताना एक भरभक्कम वेष लागते. हि वेष शिवाजी महाराजांनी मंदिर जीर्णोधाराच्या वेळी बांधली असून तिला जिजाऊ वेष असेही म्हणतात. वेशीतून आत येताना एक अतिशय सुंदर आणि तेवढाच भक्कम दरवाजा लागतो. त्याला शेंडगे दरवाजा म्हणतात.



शेंडगे दरवाजा ओलांडल्यानंतर आपण मंदिराच्या प्रवेश द्वारापर्यंत पोहचतो. तेथेच आपल्याला दीपमाळ पाहायला मिळते. डाव्या हाताला नगर खाना आहे आणि समोरच पंच नंदीचे दर्शन आपल्याला घडते. पूर्वी येथे एकच नंदी होता नंतर कोणा एका भक्ताने आपला नवस फेडण्यासाठी चार नंदी अर्पण केले. नंदीच्या दर्शनानंतर आपण मुख्य मंदिराकडे निघतो. मंदिराच्या पायरी वर आपल्याला नतमस्तक पार्वती दिसते. लोटांगण घातलेली पार्वतीचे शिल्प चांदी मध्ये कोरलेले असून अतिशय देखणे आहे, शंकराला शरण गेलेली पार्वती यात दिसते. त्यापुढे कासवाचे दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो.



शिंगणापूरच्या डोंगरावरून एक तलाव दिसतो त्याचे नाव पुष्कराज तलाव असून तो मालोजी राजे यांनी बांधला आहे. शिंगणापूर देवस्थान हे भोसले राजघराण्याचे खाजगी संस्थानाच्या ताब्यात असून महादेवाच्या सेवेचा मान पाच वेगवेगळ्या जमातींना दिलेला आहे.



ब्राह्मण हा मुख्य पुजारी असून देवाच्या नित्य पूजेचे काम ते पाहतात. गुरावांना नंदीच्या पूजेचा मान दिला आहे. कोळी समाजाचे लोक देवाच्या अंगाराची व्यवस्था पाहतात. जंगम लोक देवाच्या नैवेद्याची तयारी करतात. पाकशाळा महादेवाच्या मंदिराखाली असून जंगम तेथेच राहतात. गाड्शी जमातीतील लोक नगार खाण्याची व्यवस्था पाहतात. सर्व धर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे ठिकाण म्हणजे शंभू महादेवाचे मंदिर. छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या पवित्र पाद्स्पर्शाने पावन झालेले हे तीर्थ क्षेत्र आहे. नंदीच्या समोर एक भला मोठा अष्टकोन कोरलेला आपणाला दिसतो. या अष्टकोनात शिवाजी महाराजांनी शंभू राजांचे शुद्धीकरण करून घेतले होते. महादेवाच्या गाभाऱ्यात दोन लिंग असून त्यापैकी एक शंकर व एक पार्वतीचे आहे. लिंगावर अनेक लेप लाऊन आता ते गुळगुळीत झाले आहे. शिंगणापुरचे हे लिंग स्वयंभू आहे असे म्हटले जाते.



अनेक वेगवेगळ्या अख्यायिका येथे ऐकायला मिळतात. सोरटी सोमनाथ मंदिरातील गडगंज संपत्ती लुटण्यासाठी गजनीच्या मोहमदाने असंख्य वेळा या देवळाच्या व देवाचा विध्वंस केला. यापैकी एका आक्रमणाच्या वेळी तेथील सोमनाथाचे लिंग सौराष्ट्रातून महाराष्ट्रात आणून ते शिंगणापूर येथे स्थापले गेले अशी अख्यायिका आहे. आजही महाराष्ट्राशिवाय कर्नाटकातून अनेक भक्तजन शिंगणापूर यात्रेला येतात. ते लोक या महादेवाला आपले कुलदैवत मानतात.



लिंगाचे दर्शन घेऊन मंदिराला फेरी मारतांना महादेवाच्या मंदिरा मागे अनेक लहान देवळे दिसतात. एका देवळात प्रचंड मोठो घंटा दिसते. हि घंटा पंच धातूची असून पोर्तुगीज चर्च मधून आणली असावी असा अंदाज आहे. या घंटा वर रोमन अक्षरात सतराशे वीस असे लिहिले आहे.



मंदिराच्या दक्षिण दिशेल सुमारे शंभर यार्डावर दुसऱ्या टेकडी वर दगडी बांधकाम आढळून येते. येथे तीन स्मारके आहेत. एका ओळीत असणारी हि स्मारके दक्षिणेकडे तोंड करून आणि पूर्व पश्चिम विस्तारलेली आहेत. पश्चिमे कडील स्मारक हे शिवाजी महाराजांचे असून, मधले शहाजी महाराज आणि पूर्वेकडील संभाजी महाराजांचे आहे. ऑगस्ट सोळाशे एकोण्याशी मध्ये संभाजी महाराजाची औरंगजेबाने हत्या केली. त्यानंतर गादीवर आलेल्या शाहू महाराजांनी या स्मारकाची बांधणी केली.



शंभू महादेवाच्या मंदिराजवळ डोंगराच्या खाली अमृतेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर बाली महादेवाचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हेही मंदिर जुन्या दगडी बांधकामाची साक्ष देते. बाली महादेवाच्या मंदिरात आपल्याला शंकराच्या पिंडीत गायीचे खुर उमटलेले दिसतात. शिखर शिंगणापूर च्या डोंगरावर शिव पार्वतीचे लग्न विष्णू ने लावून दिले . शिव आणि हरी हे वेगळे नसून एकाच आहे आणि भक्तांनी भेद विसरून जावे हा संदेश येथे देण्यात आला आहे. याच संदेशाचे रूपक असणारे शिल्प शिंगणापूरच्या मंदिराच्या खांबा वर दिसते. त्यात एक हत्ती आणि नंदी आहे. हत्तीचे शरीर झाकले तर नंदी दिसतो जो शंकराचे वाहन आहे आणि नंदीचे शरीर झाकले तर हत्ती दिसतो जो विष्णूचे वाहन आहे.

मंदिरा बाहेरील नंदी दगडाचा असून त्यावर आता पत्रा बसविला आहे. नंदीचा मंडप शंभर कमळाच्या बनविला आहे.



मंदिरा बाहेर दोन दीपमाळ आहेत ज्या शिवाजी महाराजांनी बांधल्या आहेत. यातील एक दीपमाळ महाराजांनी आपल्या सेविकेच्या नावाने बांधली असून त्यांचे नाव "विरू बाई" होते. प्रत्येक मंदिरात गणपतीला स्थान असते. तसेच येथेही गाभाऱ्या बाहेर गणपतीची प्रतीष्टापणा केली आहे. या गणपतीच्या मंदिराचे वैशिष्ट महणजे येथे दोन फिरते दगडी खांब आहे. पुरातन शिल्पा कलेचा अनोखा नमुना येथे पाहायला मिळतो. मंडपाच्या एका भिंतीवर कलींया मर्दनाचे सुंदर शिल्प कोरलेले दिसते.



मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत. एक मुख्य प्रवेशद्वार असून तीन उप प्रवेशद्वार आहेत. दक्षिणे कडील प्रवेशद्वारातून बाली मंदिराचे दर्शन घडते तर पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून शिवाजी महाराजांचं स्मृती स्थळ पाहायला मिळते.

मंदिर दोन भागात विभागले गेले आहे. मूळ गाभारा आणि बाहेरचा सभा मंडप. सभा मंडपाचा आकार चांदणी प्रमाणे आहे. मंडपाला भिंतीचा आधार नसून तो बारा भक्कम खांबांवर बांधला गेला आहे. सध्या अनेक लहान खांब आधारासाठी बांधले आहेत. संपूर्ण मंदिराच्या खांबांवर पुराणातील अनेक कथा शिल्प रुपात कोरलेल्या आहेत. एका शिल्पात स्त्री शिकार करताना दर्शवली आहे. तसेच कुत्र्यांचा वापर शिकारी साठी दाखवला आहे. एका शिल्पात पुरुषाने बंदूक वापरताना कोरलेला आहे काही खांब हे फुल-वेलीच्या नक्षीत कोरलेले आहेत.

शिखर शिंगणापूर देवस्थान शिंगणापूरच्या डोंगरावर वसलेले आहे आणि येथील मंदिर अतिशय पुरातन असून मोठ्या मोठ्या दगडी शिळांमध्ये घडवलेले आहे. मंदिराचा एकूण परिसर अंदाजे एक एकर असावा.

मंदिरात जाण्या साठी सुमारे दीडशे पायऱ्या चढाव्या लागतात परंतु आता रस्त्याचे काम केल्याने गाड्या सरळ देवळाजवळ जातात. हे मंदिर यादव काळात बांधले गेले असून परिसराचे नाव "शिंगणापूर" हे यादव राजा"शृंगारपुर" यांच्या नावावरून देण्यात आले आहे. यादव कालीन हे मंदिर हेमाडपंती बांधकामाची साक्ष देते. शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोधार करताना मूळ मंदिराच्या सौंदर्यात कमीपणा येणार नाही याची काळजी घेतली. हे मंदिर इ. स. पू. बाराशे शतकातील असूनही आज भक्कम आहे.